क्लासवन अधिकारी उज्वला टिंगरे यांचा झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्यावतीने सत्कार संपन्न
झरे /प्रतिनिधी
श्री. प्रविण पारसे सर
न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया
झरे ता. आटपाडी येथील श्रीरंग टिंगरे या मेंढपाळाची मुलगी कु. उज्वला श्रीरंग टिंगरे ही क्लास वन अधिकारी बनली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील उज्वला एकदम हलाकीच्या परिस्थितीमध्ये शाळा शिकून रात्रंदिवस मेहनत करून क्लासवन अधिकारी म्हणून यशस्वी झाली. तिच्या या यशाने सर्वच थरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा सर्वत्र वर्षाव होत आहे.
आज मंगळवार दि. 23 जानेवारी 2024 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी कु. उज्वला श्रीरंग टिंगरे यांचा जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी उज्वलाचे वडील श्रीरंग टिंगरे, आई, मामा, मामी, चुलता चुलती, भाऊ तसेच झरेतील शिवसेना नेते शंकर पाटील, आटपाडी तालुका आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे, सेवानिवृत्त शिक्षक विलास कारंडे सर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, मेंढपाळाच्या घरातील मुलगी की जिच्या घरात अभ्यासपुरक कोणतेही वातावरण तसेच कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अतिशय संयमाने क्लासवन अधिकारी झाली आहे. याचा मला, माझ्या शाळेला व संपूर्ण परिसराला अभिमान वाटत आहे. उज्वलाच्या यशाची किर्ती सर्वदूर पसरली आहे. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला तर निश्चितच भविष्यात तुम्ही उत्तुंग भरारी घ्याल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना उज्वला टिंगरे म्हणाली की, माझी घरची परिस्थिती अतिशय बेताची असून वडील मेंढपाळ व आई मजुरी करते. परंतु अशा परिस्थितीत देखील त्यांनी माझ्यासह पाच मुली व एक मुलगा यांचे शिक्षण थांबवले नाही. किंबहुना परिस्थिती हलाखीची असून सुद्धा शिक्षणाला आई-वडिलांनी काही कमी पडू दिले नाही. गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही, हे सांगताना उज्वलाला अश्रू अनावर झाले. माझ्या आईवडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, परंतु माझे शिक्षण पूर्ण करायचं हा ध्यास त्यांनी मनात धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने आज यश मिळाले असे ती साश्रूपूर्ण नयनांनी म्हणाली.
उज्वलाच्या यशात तिचे आई वडील, भाऊ बहिणी सोबतच शालेय जीवनापासून लाभलेल्या सर्व शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. तिच्या या निवडीमुळे परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षांव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या