टेंभू पाचव्या टप्प्यास क्रांतिवीर नागनाथ अण्णांचे नाव द्यावे - डॉ. भारत पाटणकर
लेंगरेवाडी येथे स्मृतिनानिमित्त सभेत एकमुखाने ठराव मंजूर.
आटपाडी- ता. २२
न्यूज प्रारंभ वृत्तसेवा / श्री. प्रविण पारसे
क्रांतिवीर नागनाथअण्णाच्या पुढाकाराने आटपाडीसह तेरा तालुक्यांची चळवळ सुरू झाली. त्यामुळेच टेंभूच्या पाचव्या टप्प्यापासून पुढे योजना मंजूर झाली. त्यामुळे येथून पुढे क्रांतिवीर नागनाथ अण्णांचे नाव द्यावे असा ठराव आज लेंगरेवाडी येथील सभेत करण्यात आला.
आज शनिवार दि. 22 मार्च 2025 रोजी आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक मुक्ती दल, पाणी संघर्ष चळवळ, क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी पाणी वापर संस्था, सोप्पेकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सभेत डॉक्टर भारत पाटणकर बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, १९९३ साली क्रांतिवीर अण्णांच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली. पाणी परिषदा, मोर्चे, आंदोलने, साराबंदी, सह्यांची मोहीम, मानवी साखळी अशी सरकारचे लक्ष वेधणारी आंदोलने करून, १९९६ साली १६००० हेक्टरला आटपाडी तालुक्यात पाणी मंजुरीचे पत्र आले. परंतु प्रत्येक कुटुंबाला समान पाणी मिळणार नसल्यामुळे विजयोत्सव न करता चळवळ नेटाने सुरू ठेऊन व बंद पाईप सिस्टीम मंजूर करून घेतली. आज तालुक्याला एकूण मिळणारे पाणी ५५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र सिंचन करणारे आहे. उर्वरीत राहिलेली कामे वगळलेल्या गावांच्यासह पूर्ण करून घेऊ. आपल्या ताब्यात पाणी घेऊन आपणच नियोजन करावे. त्यांनी पहिल्या पाणी परिषदे पासून आज पर्यंतचा इतिहास सांगितला.
ते पुढे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटपाचे बंद पाईपलाईनचे अजूनही बरेचसे काम शिल्लक आहे. वगळलेल्या गावांमध्ये बंद पाईपलाईन करणे बाकी आहे. आज घानंद व खरसुंडी वितरीकेवर पाणी वापर करून पाणी वितरण चालू आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेज वगैरे सारखी कामे अपुरी आहेत. अशी कामे पूर्ण करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करावा लागेल. यासाठी चळवळीत सुरुवातीपासून काम करणाऱ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे म्हणाले की, क्रांतिवीर नागनाथ आण्णानी वाळव्यातून या ठिकाणी येऊन आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून चळवळ उभी केली. त्यांना डॉ. पाटणकर व अनेक नेत्यांनी साथ दिल्याने तालुक्यात पाणी आले. त्याचे योग्य नियोजन आपण करावे. पाणी वापर संस्था करून संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने निवडून आदर्श काम करावे. एकोप्याने काम करावे, हीच क्रांतिवीर अण्णांना आदरांजली ठरेल.
स्वागत व प्रास्ताविक शिवाजी लेंगरे यांनी केले. यावेळी पाणी वापर संस्थेच्या अध्यक्ष व संचालक यांचे सत्कार करण्यात आले. सुरवातीला स्मृतिदिनानिमित्त गावातील भजनी मंडळ यांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मधुकर लेंगरे, मुरलीधर लेंगरे, वासुदेव लेंगरे, सर्जेराव घूटूगडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंदे, शेखर रणदिवे, सुनील पवार, अशोक चौगुले, श्रीमंत जरग, जनक सरगर, आण्णा सरगर, उमेश लेमटे, अमोल माने, कुसुम विभूते, भीमराव यमगर, न्यूज प्रारंभचे संपादक प्रविण पारसे, नितीन हेगडे, हर्षवर्धन गळवे, यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या