राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २१ जून रोजी; २७ मार्चपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
न्यूज प्रारंभ नेटवर्क
झरे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६' चे आयोजन रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावरील (इयत्ता १ ली ते ५ वी) पेपर क्रमांक १ आणि उच्च प्राथमिक स्तरावरील (इयत्ता ६ वी ते ८ वी) पेपर क्रमांक २ अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा घेतली जाईल. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया २७ मार्च २०२६ पासून सुरू होत असून, १६ एप्रिल २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल. परीक्षार्थींनी परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले आवेदनपत्र भरावे. अर्ज भरताना उमेदवारांनी आपली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, जात प्रवर्ग आणि इतर माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच अचूक भरावी, कारण एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. तसेच, ज्या उमेदवारांना दोन्ही पेपर द्यायचे आहेत, त्यांनी अर्जात तसा विकल्प निवडावा, जेणेकरून त्यांची बैठक व्यवस्था एकाच केंद्रावर होऊ शकेल.
परीक्षेचे प्रवेशपत्र ९ जून २०२६ ते २१ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. २१ जून रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:०० या वेळेत पहिला पेपर, तर दुपारी २:३० ते ५:०० या वेळेत दुसरा पेपर होईल. विशेष म्हणजे, सन २०१८ आणि २०१९ च्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या आणि ज्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे, अशा उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. अर्जासंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्यास परीक्षार्थींनी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत ९०२८४७२६८१/८२/८३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या