रविवारी २ ऑगस्टला झरे येथे एकदिवसीय साहित्य संमेलन

न्यूज प्रारंभ
By -
0

 

रविवारी २ ऑगस्टला झरे येथे एकदिवसीय साहित्य संमेलन



झरे | प्रतिनिधी : 

न्यूज प्रारंभ नेटवर्क 


आटपाडी तालुक्यातील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे येथे रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या साहित्य मेळाव्यात विविध साहित्यप्रकार, पुस्तक परिचय, काव्यसंमेलन, अध्यक्षीय भाषण आणि विनोदी कथाकथन अशा बहुरंगी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना अनुभवता येणार आहे. आटपाडी तालुका साहित्य मंच, खानापूर-कडेगाव तालुका साहित्य परिषद आणि झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन संपन्न होणार आहे.


या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समीक्षक व मायणी कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी विराजमान राहणार आहेत, तर कवी सुनील जवंजाळ यांची काव्यसंमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाषबापू पाटील यांच्या हस्ते सकाळी ग्रंथपूजन करून संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.


संमेलनातील पुस्तक परिचय हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरणार असून, गझलकार सुधाकर इनामदार यांच्या "मी चंदन व्हाया बघतो" या पुस्तकावर प्रा. विश्वनाथ गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांच्या "बनगी आणि बिरमुटं" या कथासंग्रहावर प्रा. डॉ. अरुण कांबळे बनपुरीकर, प्रा. साहेबराव चवरे यांच्या "वानुळा" या पुस्तकावर प्रा. श्रीकृष्ण पडळकर, तसेच जयसिंग देशमुख यांच्या "माझ्या लेकी" या पुस्तकावर प्रा. डॉ. विजय शिंदे आपले अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत.


प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी यांचे अध्यक्षीय भाषण आणि कथाकथनकार जीवन सावंत यांचे विनोदी कथाकथन हे संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यानंतर कवी सुनील जवंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार असून, आटपाडी, खानापूर, कडेगाव, माण आणि सांगोला तालुक्यातील कवी व साहित्यिक त्यामध्ये सहभागी होणार आहेत.


या साहित्य संमेलनाचा लाभ परिसरातील सर्व साहित्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरेचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, आटपाडी तालुका साहित्य मंचाचे अध्यक्ष सुनील दबडे तसेच मंचाचे सचिव सुधाकर इनामदार यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*