पुणे येथील उद्योजक गिरीश साठे यांच्या दातृत्वाने झरे शाळेतील चिमुकले गहिवरले; स्पर्धा परीक्षा संचाचे वाटप
झरे : न्यूज प्रारंभ प्रतिनिधी
ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी आणि शेतकरी, कष्टकरी, मजुरांच्या मुलांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे, या उदात्त हेतूने पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक गिरीश साठे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरे येथील विद्यार्थ्यांना मोलाची मदत केली आहे. साठे यांनी इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना सुमारे १५ हजार रुपये किमतीचे शिष्यवृत्ती परीक्षा पुस्तक संच भेट दिले असून, त्यांच्या या दातृत्वामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे.
झरे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही महागडे शिष्यवृत्ती परीक्षा पुस्तक संच विकत घेणे आर्थिक अडचणींमुळे शक्य नव्हते. ही बाब शाळेतील शिक्षकांनी गिरीश साठे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या उपक्रमाला तात्काळ होकार दिला. साठे यांनी तातडीने चिमुकल्या बालगोपाळांना हे स्पर्धा परीक्षा पुस्तक संच उपलब्ध करून दिले. ही दर्जेदार आणि महत्त्वाची पुस्तके हाती आल्यामुळे निरागस विद्यार्थ्यांचा आनंद ओसांडून वाहत होता.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी गिरीश साठे यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. समाजात अनेक प्रकारचे दान केले जाते, परंतु पुस्तक रुपी दान हे सर्वश्रेष्ठ आणि दुर्मिळ असते, अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखवल्या. पुस्तक रूपाने या चिमुकल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी एक मोलाची ज्ञान शिदोरी मिळाली असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
साठे यांनी हे पुस्तक दान करून समाजापुढे एक वेगळा आणि सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून, या ज्ञानमंदिरातील चिमुकल्यांचे आशीर्वाद साठे यांना मिळतील, अशा भावना पालकांमधून व्यक्त होत आहेत. साठे यांच्या या मदतीमुळे झरे परिसरामध्ये त्यांचे विशेष कौतुक होत असून, अशा दातृत्वामुळेच ग्रामीण भागातील गुणवत्ता सिद्ध होण्यास मदत होणार आहे.
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी बुद्धिमत्ता आहे, मात्र अनेकदा अद्ययावत शैक्षणिक साहित्याअभावी हे विद्यार्थी मागे पडतात. गिरीश साठे यांनी दिलेले हे पुस्तक संच केवळ कागद नसून ती या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची शिदोरी आहे. त्यांच्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आता त्यांना अधिक सोपे होणार आहे. साठे यांचा हा आदर्श इतर दानशूर व्यक्तींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे." - सोमनाथ गाडे, शिक्षक


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या