'सवळाकार' विठ्ठल खिलारी यांचा सत्कार संपन्न
झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीने सत्कार संपन्न
न्यूज प्रारंभ वृत्तसेवा / श्री. प्रविण पारसे सर
आटपाडी : झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला श्री. विठ्ठल खिलारी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी 'सवळाकार' विठ्ठल खिलारी यांचा जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, झरेचे संस्थापक व अध्यक्ष 'वानुळाकार'प्रा. साहेबराव चवरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामीण कथालेखक विठ्ठल खिलारी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे पुस्तक लिहिलेले आहे. विठ्ठल खिलारी हे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी सिनियर कॉलेज, झरे येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. अतिशय शांत आणि संयमी असणारे खिलारी सर हे ग्रामीण कथा लेखक म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांना वाचन व लेखनाची आवड आहे.
आज सोमवार दि. 10 मार्च 2025 रोजी विद्यालयामध्ये त्यांचा सत्कार केल्यानंतर मला भावी लेखन करण्याची प्रेरणा मिळाली आहे , असे त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष 'वानुळाकार' प्रा. साहेबराव चवरे सर यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यासोबतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या स्त्री संघर्षाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. असंख्य आव्हाने पेलून त्यांनी समाजातील स्त्रियांना शिक्षित केले. मनुवादी विचारसरणीला झुगारत त्यांनी स्वतः कंबर कसून भारतीय स्त्री स्वतंत्र केली. शैक्षणिक व सामाजिक स्वातंत्र्य या स्त्रीला नव्हते. त्यांनी हे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम केलं असे प्राध्यापक साहेबराव चवरे सर म्हणाले .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राध्यापक चवरे सर , सत्कारमूर्ती विठ्ठल खिलारी सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाचे प्रमुख संतोष वाघमारे सर यांनी केले, तर आभार हिंदुराव वाघमोडे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या