'आदर्श माता-पिता सन्मान' पुरस्काराने प्रा. साहेबराव चवरे व सौ. रेखा चवरे सन्मानित

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 'आदर्श माता-पिता सन्मान' पुरस्काराने प्रा. साहेबराव चवरे व सौ. रेखा चवरे सन्मानित



प्रतिनिधी / श्री. प्रविण पारसे (सर) , झरे. 

 'सुसंगत फाउंडेशन पुणे' या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'आदर्श माता-पिता सन्मान पुरस्कार'  प्रा. साहेबराव चवरे व सौ. रेखा चवरे यांना नुकताच देण्यात आला.  

पुणे येथे दि. 21 जानेवारी 2023 रोजी सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व प्रसिद्ध उद्योजक कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सुसंगत फाउंडेशनचे चेअरमन डाॅ. सुधाकर न्हाळदे, सचिव सौ. संगीता न्हाळदे, उपाध्यक्ष धो. म. गडदे, संचालिका ॲड. वैशाली करे, मा.गोविंद दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ.सुधाकर न्हाळदे (अध्यक्ष, सुसंगत फौंडेशन) प्रा.साहेबराव चवरे, डॉ.श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष) सौ.रेखा , अमृता व सौ. सबनीस.


प्रा. साहेबराव चवरे हे अशिक्षित कुटुंबात जन्माला येऊन अत्यंत खडतर व प्रतिकूल परिस्थितीतून संघर्षमय जीवन जगत उच्च शिक्षण घेऊन, मराठीचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी 33 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. 

शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय व साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. 

राजकीय क्षेत्रात पंचायत समिती सदस्य म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे व उपेक्षितांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात मदत केली आहे.


 

1983 मध्ये जागृती वाचनालयाची स्थापना करून सुमारे पंधरा हजार ग्रंथांचे 'ब वर्ग' दर्जाचे वाचनालयही ते चालवत आहेत. गेली 40 वर्षे ते वाचनालयाचे चेअरमन आहेत.

 'जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था' नावाची एक शिक्षण संस्था स्थापन केली आहे. ते त्या संस्थेचे संस्थापक व विद्यमान चेअरमन आहेत. 'शहाणे करून सोडावे | सकळ जन || या ब्रीद वाक्याने संस्था स्थापन करून गरीब, गरजू, वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 'झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे' ही त्यांची शाळा सतत 17 वर्षे 100% निकाल लावणारी जिल्ह्यातील अग्रगण्य शाळा आहे

प्रा. साहेबराव चवरे उत्तम कथालेखक व कथाकथनकार आहेत. त्यांचा 'ग्रंथाली' प्रकाशनाने 'वानुळा' हा कथासंग्रह ही प्रसिद्ध केला आहे. साहित्य जगतात त्यांचा वावर व दबदबा आहे. 

उत्तम व परखड विचार मांडणारे ते प्रभावी वक्तेही आहेत. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन यातही त्यांनी मोलाचे काम केले आहे. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पाणी चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. या चळवळीत 1993 पासून आज अखेर ते सक्रिय आहेत. पुरोगामी विचारांच्या सर्व चळवळीत त्यांचा सहभाग असतो. 

स्वकर्तुत्वाने उत्तुंग भरारी घेणाऱ्या अनेक कर्तुत्ववान लोकांना  'झरे पंचक्रोशी भूषण पुरस्कार' देऊन ते गौरवतात. जे जे चांगले तेथे ते असतातच. इतरांच्या मुलांवर सुसंस्कार करतानाच त्यांची स्वतःची तीन अपत्ये ही उच्चशिक्षित व सुसंस्कारित आहेत. 

थोरली मुलगी स्वाती. ही एम. ए. बी. एड. असून जावई ॲड. आप्पासाहेब सरगर हे सांगलीत आपल्या दोन मुलासह आनंदात आहेत. 

दुसरी मुलगी अमृता. ही बी. एससी. ॲग्री झाली असून, ती एपीआय म्हणून काम करते आहे. पोलीस अधिकारी म्हणून ती सध्या पुण्यामध्ये कार्यरत आहे. तर जावई  सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. तिला एक मुलगी आहे. 

 मुलगा सत्यजित. तो बी. ई. (सिव्हिल इंजिनिअर) असून, सुनबाई स्नेहल या कम्प्युटर इंजिनियर आहेत. बांधकाम व्यवसायात तो स्थिरावत आहे.

 इतरांच्या मुलांना ज्ञानदानासह सुसंस्कारित करताना त्यांनी स्वतःची मुले सुद्धा उच्चशिक्षित व सुसंस्कारी बनवली आहेत. त्यामुळेच त्यांना 'आदर्श माता-पिता सन्मान' या पुरस्काराने गौरविले आहे.

 प्रा. साहेबराव चवरे यांच्या यशात त्यांची पत्नी सौ. रेखा चवरे यांचाही वाटा सिंहाचा आहे. एका कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे तितकीच साथ देणारी खंबीर स्त्री असावी लागते. तशी त्यांनी त्यांना खंबीर साथ दिली आहे.  बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे चवरे सर घराबाहेर स्वैरपणे वावरत असताना, घरातील एक बाजू तितक्याच समर्थपणे सौ. रेखा चवरे यांनी पेलली आहे. आणि म्हणूनच हा 'आदर्श माता-पिता सन्मान पुरस्कार' खऱ्या अर्थाने सार्थ ठरला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*