झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांची पुण्यतिथी साजरी
झरे / प्रतिनिधी
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे स्वातंत्र्य सेनानी नागनाथ आण्णा नायकवडी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद घोणते यांच्यासह सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कोमल वगरे या विद्यार्थीनीने व मुख्याध्यापक देवानंद घोणते यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र यादव यांनी केले. तर आभार प्रविण पारसे यांनी मानले. नागनाथ आण्णांनी सुरु केलेल्या पाणी संघर्ष चळवळीत डाॅ. भारत पाटणकर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे व सचिव भीमाशंकर स्वामी यांचा हिरिरीने सहभाग होता. 'शेतात पाणी बघणार, मगच चळवळ थांबणार' हे त्यांच्या चळवळीचे ब्रीदवाक्य होते. अखेर पाणी बघण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
१९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले होते . धुळ्याजवळ चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. साताऱ्यात नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली सागाव (कोल्हापूर) येथील पोलिस चौकीतून त्यांनी बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली.
१९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. १९८५ साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता.
स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला. वाळवा तालुका म्हणजे कर्तबगार लोकांचा तालुका.अशा तालुक्याला भूषण ठरलेल्या काही मोजक्या हस्तींमध्ये क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव अग्रस्थानी येते. थोर स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णांचा इतिहासात तर उल्लेख आहेच, पण सहकाराचा दीपस्तंभ आणि सामाजिक चळवळीचा धगधगता अग्निकुंड म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. अशा महापुरुषाचे निधन 22 मार्च 2012 रोजी झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या