झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात शिवजयंती साजरी करुन NTS परीक्षेतील गुणवंताचा सत्कार संपन्न
झरे/प्रतिनिधी
झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन प्रा. साहेबराव चवरे, सचिव भिमाशंकर स्वामी, शंकरराव पाटील, प्रशालेचा माजी विद्यार्थी NTS परीक्षा गुणवत्ता धारक आप्पा माळवे, मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
सुरूवातीला छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी, आणि संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुणवत्ताधारक विद्यार्थी आप्पा माळवे याचा सत्कार करण्यात आला. आप्पा माळवे याने नुकतेच NTS परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
दरम्यान, शिवरायांचे शिवचरित्र मुलांनी वाचावे आणि स्वतःमध्ये राष्ट्रभक्ती प्रामाणिकपणा कामाप्रती निष्ठा शिस्त बाळगावी असे आवाहन प्रा. साहेबराव चवरे यांनी केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, गरीबी ही शिक्षणाच्या आड येत नाही, त्यासाठी शिक्षण मध्येच थांबवू नका. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले आणि राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक गड जिंकले व गुलामगिरी नष्ट केली. रयतेला अंधारातून प्रकाशात आणले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला.
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी राजांचा "राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला असे ते म्हणाले. त्यांनी आप्पा माळवेचा आपल्या भाषणातून वारंवार गौरव केला. यावेळी गणेश पाटील या विद्यार्थाने शिवराय आणि समाजजीवन याविषयी मनमोकळा संवाद भाषणातून साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तावीक संतोष वाघमारे यांनी केले, तर आभार हिंदुराव वाघमोडे यांनी मानले.
दरम्यान, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. यानंतर जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, सचिव भिमाशंकर स्वामी, मुख्याध्यापक देवानंद घोणते यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. यावेळी प्रा. एन. डी. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या