इयत्ता १० वी व १२ वी च्या बोर्ड परीक्षेदरम्यान केंद्रसंचालक, पर्यवेक्षक इत्यादींच्या अदलाबदलीच्या निर्णयास कृती समितीचा विरोध
सांगली/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी च्या बोर्ड परीक्षेदरम्यान केंद्रसंचालक, पर्यवेक्षक इत्यादींच्या अदलाबदलीच्या निर्णयास स्थगिती देण्यास कृती समितीने विरोध दर्शविला आहे. जर निर्णय मागे घेतला नाही तर २७ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील सर्व विभागीय परीक्षा मंडळाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी दिला आहे.
आज सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी शिरोळ तालुक्यातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत विरोध दर्शविला आहे. यावेळी शेकडो शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापक हजर होते. राज्यातील इ. १० व १२ वी च्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत. केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांची, त्यांचे केंद्र सोडून दुसत्या केंद्राचे केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांची अदलाबदल करून नेमणूक करण्यात यावी. असा निर्णय घेतलेला आहे. तो मान्य नसून राज्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रकार आहे.
यामध्ये जे मूळ केंद्रावरील केंद्रसंचालक व काम करणारे मुख्याध्यापक यांना संबंधित केंद्राची व त्याठिकाणच्या भौतिक व सामाजिक सुविधांच्याबाबत संपूर्ण माहिती असते.
जे दुसऱ्या केंद्रावरचे केंद्र संचालक व पर्यवेक्षक असतील त्यांना वेळेत येणे-जाणेची अडचणी निर्माण होतील. कारण राज्यात हजारो परीक्षा केंद्रे आहेत. सर्वच केंद्रामधील अंतर जवळ असेलच असे नाही. त्या कालावधीमध्ये शाळांचे इतर वर्ग सुरु असल्यामुळे जे पर्यवेक्षक असतील त्यांना पर्यवेक्षण झालेनंतर परत आपल्या शाळेत जावे लागणार आहे. तसेच येता-जाताना केंद्रसंचालक व पर्यवेक्षक यांचा सदर परीक्षेच्या मानसिक ताण-तणावामुळे प्रवासादरम्यान अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? तसेच या सर्वांना दुसऱ्या अनोळखी केंद्रावर संरक्षण कोण देणार? त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतील.
तरी इयत्ता १० वी व १२ वी च्या बोर्ड परीक्षेदरम्यान केंद्रसंचालक, पर्यवेक्षक इत्यादींच्या अदलाबदलीच्या दि. १७ जानेवारी २०२५ च्या निर्णयास स्थगिती देणेत यावी व पूर्वी प्रमाणेच केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांना आहे त्या परीक्षा केंद्रावरच नेमणूक करण्यात यावी असे पत्र कृती समितीच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिले आहे.
शासनाने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा २७ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील सर्व विभागीय परीक्षा मंडळाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या