झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
झरे/ प्रतिनिधी
झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय या प्रशालेत 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील ध्वजाचे ध्वजारोहण जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, सचिव भीमाशंकर स्वामी सर, सेवानिवृत्त सैनिक औदुंबर, आटपाडी आरपीआय तालुका अध्यक्ष धनंजय वाघमारे, शिवसेना नेते शंकर पाटील, औदुंबर यादव, सत्यवान बेरगळ, नितिन वाघमारे, अमोल शेठ जुगदर, माजी विद्यार्थी डाॅ. सागर जुगदर, जीवन पाटील, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
यानंतर सुमधूर वाद्यवृंदाच्या गजरात 'भारत माता की जय', 'जय जवान, जय किसान', 'प्रजासत्ताक दिनाचा विजय असो' अशा घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. सैनिक वेषधारी मुले-मुली, तिरंगा फेटा व तिरंगी साडी परिधान केलेल्या विद्यार्थ्यीनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत होते.
दुसऱ्या सत्रात प्रशालेतील विद्यार्थ्यांची 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे झाली. यानंतर इ. 6 वी तील विद्यार्थी अजिंक्य जाधव याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच इयत्ता नववी च्या विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी बोलताना आरपीआय आटपाडी तालुकाध्यक्ष धनाजी वाघमारे म्हणाले की, भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा 76 वा साजरा करत असताना देशाला अनेक भीषण समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सामाजिक एकोपा जवळपास संपत आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय तसेच कृषी विषयक परिस्थितीवर भाष्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक देवानंद घोणते सर यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले व आभार प्रविण पारसे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या