झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
झरे / प्रतिनिधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आटपाडी तालुका आर.पी.आय. अध्यक्ष धनंजय वाघमारे व जागृती वाचनालयाचे विद्यमान संचालक दिलीप वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर व धनंजय वाघमारे यांची मनोगते झाली.
यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय म्हणजे उपेक्षित, तेजोहिन आणि सामाजिक चेहरा नसलेल्या समाजघटकांमध्ये मानवी हक्कांबद्दल जागृतता निर्माण करणाऱ्या क्रांतीसूर्याचे आगमनच होय. जाती-पातीच्या विषमतेवर आणि तथाकथित मनुवादी समाजव्यवस्थेत शेकडो वर्षे गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या दलित-पददलित लोकांना नवा सामाजिक चेहरा देण्याचं व त्यांना बोलकं करण्याचं ऐतिहासिक कार्य महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यातून तथाकथित समाजातली वर्णव्यवस्था व जातीभेदाचे समूळ उच्चाटन करत देशात सामाजिक समता प्रस्थापित केली.
यावेळी प्रा. साहेबराव चवरे सर, धनंजय वाघमारे, दिलीप वाघमारे, मनोहर वाघमारे सर, शिवसेना नेते शंकर पाटील, सत्यजित चवरे, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष वाघमारे सर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या