झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांची पुण्यतिथी साजरी
झरे / प्रतिनिधी
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे क्रांतीवीर पद्मभूषण डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर ,सचिव भीमाशंकर स्वामी सर , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते .
स्वातंत्र्य लढ्यानंतर सुराज्य आलं पाहिजे या ध्यासानं नागनाथ अण्णांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या चळवळींमध्ये हिरीरीनं पुढाकार घेतला होता. हुतात्मा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेती आणि सहकार क्षेत्रात आदर्श उपक्रम राबवले. नागनाथअण्णांनी एन.डी.पाटील, गणपराव देशमुख या नेत्यांसह अनेक ठिकाणी पाणी परिषदा घेऊन पाणी प्रश्नावर ग्रामीण महाराष्ट्रात रान पेटवले होते . राज्य सरकारनं त्यांना 2007 साली 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवलं होतं.
आज शुक्रवार दि . 22 मार्च 2024 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे क्रांतीवीर पद्मभूषण डॉ . नागनाथअण्णा नायकवडी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर म्हणाले की, क्रांतीवीर नागनाथ आण्णांचा वेळेच्या बाबतीतला शिरस्ता अतिशय कडक होता. दिलेल्या वेळेत उपस्थित राहून अनेकदा अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता . यावेळी प्रा. चवरे सरांनी आण्णांचा जीवनावर प्रकाश टाकला . आण्णांसोबत राहण्याचा, फिरण्याचा तथा बोलण्याचा अनेकदा योग आला . यामध्ये त्यांच्या जीवनशैली जाणून घेतल्या. आण्णा दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करायचे . घर व शाळा अतिशय जवळ असून सुद्धा जेवायला ते घरी जात नसत. त्यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगिकारली होती. त्यांना लग्नातील डामडौल आवडत नव्हता. लग्न साधी करावीत असा त्यांचा आग्रह होता . जनतेप्रति त्यांच्या मनात समर्पित भाव होता .
'शेतात पाणी बघणार, मगच चळवळ थांबणार' हे त्यांच्या चळवळीचे ब्रीदवाक्य होते. अखेर पाणी बघण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. १९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
१९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती.
स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला. अशा महापुरुषाचे निधन 22 मार्च 2012 रोजी झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या