परदेशी शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना १२ कोटींची शिष्यवृत्ती
न्यूज प्रारंभ डिजिटल मिडिया
परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गांतील (ओबीसी) विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या शिष्यवृत्तीचे १२ कोटी ८८ लाख शासनाने मंजूर केले असून इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. परदेशात गेलेले ओबीसी विद्यार्थी आर्थिक संकटात असल्याचे वृत्त वायरल झाल्यानंतर शासनाने त्याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केली.
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या ओबीसी समाजातील ५० विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारने ३० ऑगस्टला या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली. त्यातील काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू झाल्याने ते परदेशातील विद्यापीठांमध्ये दाखलही झाले. परदेशात जाण्यासाठी विमानाच्या तिकिटांची रक्कम, तेथील वसतिगृहाचे भाडे, शिक्षण शुल्क, विमा शुल्क, तसेच दैनंदिन गरजांसाठीची रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले; परंतु ते मिळाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक चणचण भासू लागली. विद्यार्थ्यांनी बहुजन कल्याण विभागाकडे विचारणा केली असता, काही दिवसांत पैसे खात्यावर जमा होणार असल्याने तूर्तास स्वत:चे खर्च करा, असे सांगण्यात आले.
शासनाने २०२३-२४ या वर्षासाठी ५० ओबीसी विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. त्यापैकी या वर्षातील ३२, तर गेल्या वर्षातील दोन विद्यार्थांसाठी १२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर केले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या