झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी
झरे/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी, मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिव भीमाशंकर स्वामी म्हणाले की, एका दलित वर्गातील गरीब मुलास आपल्या राहत्या घरी आश्रय देऊन कर्मवीर अण्णांनी ज्ञानदानाची गंगोत्री सुरु केली. आज या गंगोत्रीचा नेत्रदीपक विस्तार होऊन तिला महासागराचे रुप आले आहे. भारत सरकारने २२ सप्टेंबर १९८६ ते सप्टेंबर १९८७ हे वर्ष डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जन्मशताब्दी वर्ष जाहीर करून कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य संपूर्ण भारतभर पोहोचविण्याचे कार्य केले.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक ख्यातनाम व्यक्तींचा समर्थ सहयोग लाभला व ज्यांच्या निष्काम आणि निरलस सेवेने शिक्षण प्रसारातून जनजागृतीबरोबर समाजात वैचारिक क्रांती घडत गेली. अशा ध्येयवादी, दूरदृष्टीच्या व क्रियाशील तेजस्वी पुरुषांत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अग्रक्रमाने समावेश होतो.
तर मुख्याध्यापक देवानंद घोणते बोलताना म्हणाले की, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे जाणून शिक्षण हाच जनजागृतीचा आणि सर्वांगीण विकासक्रांतीचा पाया आहे, हे ओळखून कर्मवीर अण्णांनी निरपेक्ष भावनेने शिक्षण क्षेत्रात काम केले. या कामाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही तोड नाही. संकुचित स्वार्थावर पाणी सोडून व्यापक हिताची भावना समाजात आली तरच समाजसुधारणा होते. नितीमूल्यांचा त्यामध्ये विकास होतो. स्वत:च्या संसाराची होळी करुन आयुष्यभर दीनदलितांसाठी, अठरा पगड जातींसाठी शिक्षण देणारा हा महामानव बहुजन समाजासाठी कर्मवीर ठरला.
दरम्यान जाग्रती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, झरे चे संस्थापक व विद्यमान चेअरमन मा.प्रा.साहेबराव चवरे सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या