झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी


झरे/प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील झरे येथे आज रविवार दि. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


 यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर यांचा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व तुरेबाज फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्राथमिक शाळा निंबवडेचे मुख्याध्यापक भरत कदम सर यांचा ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षक विलास कारंडे सर यांचा संतोष वाघमारे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  विद्यार्थी व विद्यार्थीनींनी विद्यालयातील शिक्षकांना गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सन्मानित केले. त्यानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी श्रावणी बल्लाळ हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ही आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी. आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन. याच दिनाचे औचित्य साधून विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.


यावेळी बोलताना प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले की, 

जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।

गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥

अशा संतपंक्ती म्हणत भाषणाला सुरुवात केली. आई-वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो. गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात. माझ्या गुरुंनी मला जीवनात अभिमानाने जगायला शिकवलं व अन्यायाविरुद्ध लढाईला शिकवलं असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे आपणास पहावयास मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आई आपली पहिली गुरु असते. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो, कारण निसर्गा कडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. जसे पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशू, पक्षी, समुद्र, नदी, त्याचबरोबर पुस्तके ही सुद्धा आपले गुरूच असतात. गुरुला वयाचे, जातीचे बंधन नसते. आताचा काळ बदललेला आहे. शिक्षण पद्धती बदललेली आहे. गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच प्रभाव होता. आपल्या गुरूंचा ही आपल्यावर खूप प्रभाव असतो.

या कार्यक्रमासाठी प्रा. साहेबराव चवरे सर, जागृती वाचनालयाचे माजी सचिव विलास कारंडे सर, मुख्याध्यापक भरत कदम सर,ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर, बिरू घोरपडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत देशपांडे या विद्यार्थ्याने केले तर आभार वाघमोडे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*