सांगलीत शिक्षक एकवटले; पैसे गोळा केले अन् थेट खात्यात ट्रान्स्फर केले. मृत शिक्षकाच्या कुटुंबाला शिक्षकांनीच सावरले
न्यूज प्रारंभ डिजिटल मिडिया
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील बोरडा गावातील ज्ञानेश्वर शेवाळे यांचे अपघाती दुःखद निधन झाले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज गावाजवळील वाडी-वस्तीच्या शाळेत 2019 पासून ते अध्यापनाचे काम करीत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सांगलीत शिक्षक एकवटून पैसे गोळा केले अन् थेट त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केले. मृत शिक्षकाच्या कुटुंबाला शिक्षकांनीच सावरले अशी भावना व्यक्त केली जात आहे.
घरची परिस्थिती हालाखीची...चार वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यात शिक्षक सेवक म्हणून नोकरी मिळाली. लग्न झाले, पत्नी आठ महिन्यांची गर्भवती...त्यात दिवाळी सुटीसाठी गावाकडे जाण्याचा बेत ... पत्नीला एसटीत बसवून स्वतः दुचाकीवरून जवळपास चारशे किलोमीटरचे अंतर जाण्याचा निश्चय.... उराशी स्वप्न, भावना, हृदयात साठवून गावी निघालेल्या शिक्षकालावरच मृत्यूने गाठले. ज्ञानेश्वर शेवाळे असे या शिक्षकाचे नाव शेवाळे कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा वेळी सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी या कुटुंबाला लाख मोलाच्या मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शिक्षकांसह सामाजिक संस्थांनीही शेवाळे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे आवाहनही केले जात आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील बोरडा गावातील ज्ञानेश्वर शेवाळे यांनी कष्टाने शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. २०१९ मध्ये त्यांना शिक्षक सेवक म्हणून नोकरी मिळाली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज गावाजवळील वाडी-वस्तीच्या शाळेत ते अध्यापनाचे काम करीत होते.
गावाजवळच ते पत्नीसह राहत होते. पत्नीही आठ महिन्यांची गर्भवती होती. तीन वर्षे ६ हजार मानधनावर कुटुंबाचा गाडा चालविला. त्यानंतर त्यांच्या मानधनात वाढ झाली. शिक्षक सेवक म्हणून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेत कायम होण्याची संधी होती. पण, जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने ते अजूनही मानधनावरच होते. जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्यांचे हेलपाटे सुरू होते. अशातच दिवाळीची सुटी लागली. पत्नी गर्भवती असल्याने तिला एसटीने पाठविले. स्वतः दुचाकीने गावाकडे निघाले होते.
पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी तसेच तालुक्याच्या ठिकाणी वैधता प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागणार असल्याने त्यांनी दुचाकीने जाण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांचा हा प्रवास शेवटचाच ठरेल, अशी शंकाही कुणाच्या मनाला शिवली नसेल. गावापासून शंभर किलोमीटरवर परळीजवळ अपघातात त्यांचे निधन झाले आणि शेवाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्ह्यातील त्यांचे सहकारी शिक्षक, संघटनाही हळहळल्या. लागलीच त्यांनी शिक्षकांना एकत्र करीत कुटुंबाच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.
घरातला कर्ता पुरूष सोडून गेला की कुटुंब उघड्यावर येते. अशावेळी आधार मिळतो तो सग्यासोयच्या, सहकारी मित्रांचा शेवाळे कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अमोल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. गेली दोन ते तीन दिवसांतच लाखाहून अधिक रक्कम या कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा केली. अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. शिक्षकासह समाजातील विविध घटकांनीही या कुटुंबाला मदत करावी, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या