झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात ‘वन वणवा सप्ताहानिमित्त’ जनजागृती

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात ‘वन वणवा सप्ताहानिमित्त’ जनजागृती




झरे (ता. आटपाडी): निसर्गाचा अनमोल वारसा असलेल्या वनसंपदेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. याच उद्देशाने 'वन वणवा सप्ताहाचे' (१ ते ७ फेब्रुवारी) औचित्य साधून आज गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देवानंद घोणते होते. यावेळी खरसुंडीचे वनपाल आर. एस. तिवडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वणवा रोखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात वणव्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान आणि त्याचे गंभीर परिणाम समजावून सांगण्यात आले. वणव्यामुळे जमिनीची धूप होणे, जलसाठ्यांवर होणारे विपरीत परिणाम आणि जैवविविधतेचा ऱ्हास होतो. तसेच इमारती लाकूड, इंधन आणि चारा यांसारख्या नैसर्गिक वनोपजांची मोठी हानी होते, अशी माहिती वनरक्षक एस. जी. मोरे आणि वनरक्षक आर. एस. बामणे यांनी दिली. वनामध्ये जाणीवपूर्वक आग लावणे हा 'भारतीय वन अधिनियम १९२७' नुसार दंडनीय गुन्हा असून अशा समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले, बिरू घोरपडे, स्वाती सरगर, संतोष वाघमारे, हिंदुराव वाघमोडे, प्रवीण पारसे, दादासाहेब बनगर, महेंद्र यादव आणि भास्कर चौधरी उपस्थित होते. तसेच वनमजूर धनाजी शितोळे यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून "सहकार्याची धरून कास, आगीपासून वाचवू वनवास" असा संदेश देत, जंगलात आग लागल्यास तत्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

विद्यालयाच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जागरूकतेची भावना निर्माण झाली आहे.



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*